कोल्हापूर : टोलवसुलीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या विरोधी निकालाचे पडसाद आज, मंगळवारी कोल्हापुरात उमटले. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने आय.आर.बी. कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, शिरोली नाका परिसरात सायंकाळी समितीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धांदल उडाली.कोल्हापुरात आय.आर.बी. या कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रस्ते केले. मात्र, हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप टोलविरोधी कृती समितीने केला आहे. दरम्यान, याप्रश्नी न्यायालयात जनहित याचिका दाखल होत्या. आज, मंगळवारी उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. त्यामुळे सायंकाळी शिरोली टोल नाका परिसरात ‘पॅटको’समोर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. ‘आय. आर. बी.चा बोका, दिसेल तेथे ठोका’ अशा घोषणा देत कोणत्याही स्थितीत टोल न देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात टोलची ‘नाकाबंदी’
By admin | Published: October 15, 2014 1:17 AM