अतुल कुलकर्णी, मुंबईज्या कामांसाठी एमएसआरडीसीची स्थापना करण्यात आली ती पीडब्लूडीने केली, एमएसआरडीसीने त्यांना दिलेली कामे नीट केली नाहीत आणि टोल संस्कृती आल्यानंतर आहे ते रस्तेही पीडब्ल्यूडीने पळवले. परिणामी एमएसआरडीसीचा पांढरा हत्ती कोणासाठी पोसला गेला, असा प्रश्न पडावा. शासनाने एमएसआरडीसीच्या स्थापनेच्या जीआरमध्ये आणि त्यानंतरच्या दुरुस्तीमध्ये (२९ नोव्हेंबर १९९६) भूमिका स्पष्ट केली होती. पीडब्लूडीला व्यापारी तत्वावर काम करता येत नाही, आणि पैसे उभे करुन काम करणे हे त्यांच्या मॅन्यूअलमध्ये नाही म्हणून पैसे उभे करण्यासाठी एमएसआरडीसीची स्थापना झाली. राज्याला व देशाला रोजगार हमी योजना देणारे वि.स. पागे यांचे चिरंजीव प्रकाश पागे यांना गडकरींनी यासाठी बोलावले. या दोघांनी मिळून बीओटी या संकल्पनेला जन्माला घातले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसी या दोन्हीसाठी एकच मंत्रीपद होते. विभागणी नंतर झाली. ५० कोटीच्या वरची कामे एमएसआरडीसीने करावीत असे गृहीत धरले होते तर ५० कोटीच्या आतली कामे देखील शासनाची मान्यता घेऊन एमएसआरडीसीकडे हस्तांतरीत करावीत (२२ आॅक्टोबर १९९६) असे मान्य केले होते. पण पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी ओरडा केल्याने, पुन्हा ४ एप्रिल १९९८ रोजी नवीन आदेश जारी केला ज्यात एमएसआरडीसीकडे कोणती कामे सोपवावीत हे स्पष्ट केले गेले. त्यातही ज्या ठिकाणी टोल लावला जाणार आहे ती सगळी कामे एमएसआरडीसीने करावीत असे ठरले प्रत्यक्षात पीडब्लूडीने टोलनाके उभे केले आणि ज्यांनी टोलची अंमलबजावणी करायची त्यांचे दिवाळे निघाले.
टोलवाला रस्ता बांधकाम खात्याने पळवला!
By admin | Published: May 14, 2015 1:33 AM