मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात १७ ऑगस्ट २०२२ म्हणजे उद्या सकाळी ११ ते ११:०१ या काळात सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथेच उभे राहून या उपक्रमात सहभाही होऊ शकता. सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू केले आहे. या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान-थोर, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वराज्य महोत्सव सुरू आहे. राज्यात सर्वत्र उद्या सकाळी ११ वाजता या एकाच वेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे. सकाळी ११ ते ११.०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची सर्वांनीच दक्षता घेणे तसेच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे अपेक्षित आहे. राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.