मुंबई : महावितरणने संकेतस्थळावरून आॅनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. राज्यभरातील महावितरणच्या ग्राहकांनी आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये तब्बल ३ हजार ४८२ कोटी ५८ लाख रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरली आहेत. आॅनलाइन सुविधेमुळे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी यात तब्बल १ हजार ५६१ कोटींची वाढ झाली आहे.वीजबिल भरण्याची व्यवस्था घरबसल्या व्हावी, म्हणून इंटरनेटद्वारे महावितरणच्या संकेतस्थळावर आॅनलाइन वीजबिल भरण्याची सुविधा लघुदाब वीजग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१४-१५ साली महावितरणच्या वीजग्राहकांनी १ हजार ९२० कोटी ८८ लाख रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरली होती. या तुलनेत २०१५-१६ मध्ये वीजग्राहकांनी तब्बल ३ हजार ४८२ कोटी ५८ लाख रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरली. वर्षभरातच आॅनलाइन वीजबिले भरणा प्रक्रियेत १ हजार ५६१ कोटी ७० लाखांची वाढ झाली आहे. वीजबिले आॅनलाइन भरण्यात आघाडीवर असलेल्या पुणे, भांडुप व कल्याण परिमंडलात २०१५-१६ मध्ये तब्बल २५०-३०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षभरात पुणे ८६० कोटी, भांडुप ७४७ तर कल्याण परिमंडलात ५५१ कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. शिवाय, आतापर्यंत वार्षिक ९० कोटीपर्यंत आॅनलाइन भरणा होत असलेल्या नाशिक परिमंडलात २७१ कोटी, नागपूर ११८ कोटी, कोल्हापूर १३५ कोटी, बारामती १५१ कोटी आणि औरंगाबाद परिमंडलात १२५ कोटी रुपयांची वीजबिले आॅनलाइन भरण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)मागील वर्षी महावितरणने मोबाइल अॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली. त्यांचा ग्राहकांनी लाभ घेतला. २ लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हे अॅप डाउनलोड केले असून, त्यांनी याद्वारे सुमारे १९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची वीज बिले भरली आहेत.लघुदाब वीजग्राहकांसाठी आॅनलाइन बिलासह इमेलद्वारे वीजबिलाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात छापील कागदाऐवजी गो-ग्रीन अंतर्गत वीजबिलाच्या ईमेलचा पर्याय स्वीकारल्यास ग्राहकाला दरमहा तीन रुपये सूट दिली जाते.वीजबिल आॅनलाइन भरण्यासाठी क्रेडिट, डेबिट किंवा नेटबॅकिंगचा पर्याय उपलब्ध आहे. वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.मुदतीनंतर भरलेल्या बिलाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखवल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळता येईल.
वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे कल
By admin | Published: May 04, 2016 2:36 AM