ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रशासनाने बेस्टच्या मालकीची ३७५ एकर जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे़. मात्र विकासाच्या नावाखाली बिल्डरांना या जागा विकण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून होत आहे़. याबरोबरच खाजगी बसगाड्या भाड्याने घेण्याच्या निर्णयाविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनमार्फत मंगळवार दि़ २८ जून रोजी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे़. यामध्ये बेस्ट चालक उपस्थित राहणार असल्याने बसगाड्यांअभावी उद्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे़. बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांमध्ये डबघाईला आले आहे़. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्टचे असंख्य प्रयत्न फेल गेले़. या उलट बस प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़. तसेच परिवहन विभागाला आतापर्यंत टाळे लागू न देणाऱ्या विद्युत पुरवठा विभागातही असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत़. अन्य वीज कंपन्यांची वाढती स्पर्धा, यामुळे घटणारे वीज ग्राहक यामुळे बेस्टपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे़. या अडचणींतून बेस्टची सुटका करण्यासाठी खाजगी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे़. मात्र अशा पद्धतीने प्रशासन सर्वच बसमार्ग खाजगी ठेकेदारांच्या हाती सोपवतील, अशी भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे़. बेस्टच्या खाजगीकरणाचा हा डाव असल्याने या विरोधात बेमुदत आंदोलन सुरु करण्याचा इशाराही बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी दिला आहे़. हा विरोध दर्शविण्यासाठी बेस्टच्या कामगारांचा उद्या आझाद मैदानावर मोर्चा येणार आहे़. या मोर्चातच आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे़.