मुंबई : आज सोमवारी, दि. १४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनिला झाकणार आहे. जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा त्या स्थितीला पिधान, असे म्हणतात, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
शनीचे हे पिधान संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे पिधान आपल्याला नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल. लहान दुर्बीण असेल किंवा एखादी द्विनेत्री - बायनोक्यूलर असेल तर या पिधानाचे चांगले निरीक्षण करता येईल. खगोलीय दुर्बीण असेल तर शनिची कडी सुद्धा दिसतील. निरीक्षणास रात्री १.३० वाजल्यापासून सुरुवात करावी. चंद्राच्या पूर्वेला तुम्हाला शनि सहज ओळखता येईल.
शनि आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येत आहेत. मग चंद्र हळूहळू शनिला आपल्या मागे झाकेल. त्या नंतर सुमारे तासाभरानंतर शनि परत एकदा चंद्राआडून बाहेर येताना दिसेल, असे अभ्यासकांनी सांगितले.
१४ ऑक्टोबर रोजी रात्री चंद्र - शनिची पिधान युती होणार आहे. मात्र त्यासाठी आकाश निरभ्र असणे जरुरी आहे. शनि पूर्वेकडील बाजूने चंद्रबिंबाआड जाईल आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडेल. रात्री ११.३० नंतर ही खगोलीय घटनेचे निरीक्षण करता येईल. प्रथम साध्या डोळ्यांनी आणि शनि चंद्रबिंबाआड जाताना दुर्बीण किंवा द्विनेत्रीतून पाहावे.- दा. कृ. सोमण, खगोल अभ्यासक