पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनचा व्हीआयपी पास देण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांना पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने पुढील तपासासाठी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
पैसे घेऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडववल्या प्रकरणात कैलास डोके व विजय देवमारे या दोघांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. या प्रकरणात मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. यामुळे शनिवारी रात्री सचिन अधटराव यांना पोलिसांनी अटक केली होती.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी मंदिर परिसरातील मंदिर परिसरात हार विक्रेते कैलास डोके व विजय देव मारे यांच्यामार्फत आणखी किती जणांकडून दर्शनासाठी पैसे घेतलेले आहेत, तसेच आणखीन कोणाकोणाच्या मार्फत दर्शन पास विक्री केलेली आहे. दर्शन पाससाठी घेण्यात आलेले पैसे बँक खात्यातून घेतले किंवा रोख घेतले याची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सचिन अधटराव यांना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यामुळे न्यायालयाने सचिन अधटराव यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.