विशाल शिर्के पुणे : एकावर एक फ्रीचा जमाना असल्याने टूथपेस्ट, स्नो पावडर, साबण कंपन्या, डिटर्जंट कंपन्या, कॉफी अशा वस्तूंवर मॉलमध्ये सवलती देत आहेत. दोन वस्तू घेतल्यास तीस ते चाळीस टक्के कमी किमतीत वस्तू मिळते, या मोहापायी अनेकदा मोठा पॅक खरेदी केला जातो. मात्र, मोठ्या पॅकमधून ग्राहकांच्या खिशातून अधिक किंमत वसूल केली जात आहे. वजन मापे कायदा धाब्यावर बसवून काही कंपन्या किमतीच्या तिप्पट रक्कम आकारत असल्याचे निष्पन्न झाले आहे.ग्राहक पंचायतीने नुकतेच दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमतीचे आणि वजनाचे सर्वेक्षण केले. त्यात वजन व किमतीत तफावत आढळून आली. पंचायतीने प्रथितयश कंपनीची टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधन, आंघोळीचा साबण, पेट्रोलियम जेली, चहा, शॅम्पू, कपड्यावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध १४ उत्पादनांची पाहणी केली. लहान वजनाच्या (पान ५ वर)(पान १ वरून) वस्तूच्या तुलनेत मोठ्या वजनाची वस्तू दीडपट ते तिपटीहून अधिक महाग असल्याचे समोर आले आहे. देशात टूथपेस्ट उत्पादनात वर्चस्व असलेल्या कंपनीची ५० ग्रॅम वजनाची टूथपेस्ट २० रुपयांना, तर दीडशे ग्रॅम वजनाची पेस्ट ९२ रुपायंना विकली जाते. म्हणजेच दीडशे ग्रॅम वजनाची ६० रुपयांची वस्तू ३२ रुपये अधिक किंमतीने विकली जाते. तीचबाब कॉपी, सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू अशा विविध वस्तूंसाठी लागू होते.वैधमापन कायद्याप्रमाणे अर्ध्या किलो वस्तूची किंमत ५० रुपये असेल तर एक किलोच्या वस्तूची किंमत शंभर रुपये असली पाहिजे. मात्र मोठ्या पॅकेटच्या वस्तूंची किंमत अडीचशे पट अधिक असल्याचे समोर आले आहे. मॉल संस्कृती रुजविण्यासाठी कंपन्यांकडून असा खेळ केला जात आहे. त्या विरोधात ग्राहक मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, कॉम्पिटीशन कमिशन आॅफ इंडिया, अॅडव्हरटायझिंग स्टँण्डर्ड कौन्सिल आॅफ इंडियाकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगरचे अध्यक्ष विजय सागर यांनी दिली.
टूथपेस्ट, कॉफी कंपन्यांकडून सर्रास ‘मापात पाप’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 6:21 AM