लक्ष्मीच्या चंचलतेशी व्यूहरचनात्मक पद्धतीनं लीलया खेळू शकलेलं एक नाव भारतभरात अल्पावधीतच प्रसिद्ध झालं. बँकिंगचं क्षेत्र एकेकाळी महिलांच्या कर्तृत्वाला म्हणावी तशी साद घालत नव्हतं. ही परिस्थिती आमूलाग्र बदलण्यात चंदा कोचर यांचा वाटा मोठा आहे. आयसीआयसीआय बँकेच्या प्रगती आणि विस्ताराला आकार देण्याला त्यांची दृष्टी कारणीभूत आहे. आयसीआयसीआय समूहात १९८४ साली दाखल झालेल्या चंदा कोचर यांनी स्वकर्तृत्वाने भरारी घेतली. एकविसाव्या शतकात प्रवेश करताना त्या आयसीआयसीआयच्या संचालक मंडळाचा भाग बनल्या होत्या. तो काळ बोर्डात एक तरी महिला संचालक असली पाहिजे, या तरतुदीचा नव्हता. त्यांचे योगदान त्यांना या सन्मानापर्यंत घेऊन गेले.
१९९० च्या दशकात आयसीआयसीआय बँक स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. बँक स्थापन झाल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञानातून सिद्ध झालेल्या प्रणालींचा खुबीने वापर करून रिटेल बँकिंगला नवा चेहरा देण्याचे आगळेवेगळÞे काम त्यांच्या नावावर जमा आहे. रिटेल बँकिंगकडून या संस्थेला जागतिक व्यवसायाची गरुड झेप घेण्याची दृष्टीही चंदा यांनीच दिली. या समूहाच्या बहुतेक महत्वाच्या निर्णयांमध्ये त्या महत्वाच्या भागीदार राहिल्या आहेत.
थोडक्यात सांगायचे, तर प्रयत्न आणि जिद्दीचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे चंदा कोचर. मॅनेजमेंट ट्रेनीच्या स्तरावरून सुरुवात केल्यावर निव्वळ स्वकर्तृत्वाच्या बळावर यश आणि पदांची नवनवी शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. बँकेतील जवळपास प्रत्येक विभागातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांचा हा प्रवास अलौकिक आहे. म्हणूनच त्यांना जागतिक पातळीवर प्रतिष्ठेसोबत अनेक सन्मान मिळाले. कॅनडातील कार्लटन विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट बहाल केली. शिवाय भारतानेही पद््मभूषण किताबाने त्यांना सन्मानित केले. जगातल्या पहिल्या शंभर प्रभावशाली महिलांमध्ये समावेश होऊ लागलेल्या चंदा यांच्या कामगिरीचे उभ्या जगाला अप्रूप आहे.