मुंबई - सोमवारपासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे तर मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. तर दुसरीकडे पुणे, कोल्हापूर भागातही पावसाने जोर धरला आहे.
खडकवासला धरणातून 22हजार 800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 100% भरले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. , सकाळी नऊ वाजता धरणातून 27 हजार 203 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करणार आहेत, तर नदी पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातही मुसळधार पाऊस असल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळख असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या २४ तासांपासून मुंबई, ठाणे, नवी आणि रायगडमध्ये मान्सूनने तुफान फटकेबाजी केली आहे. विशेषत: मुंबईत तुफान पाऊस कोसळला असून, येथे १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरावर व त्या लगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरासह लगतची ओडिशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगालवर ते स्थित आहे. परिणामी, मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर राहील. मराठवाड्यातही सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.