ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 20- लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीला पुण्याला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणा-या धनंजय उंबरे (29) या खासगी शिक्षकाला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला 22 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ही मुलगी नववीत असल्यापासून तो तिला गणित आणि विज्ञान शिकविण्यासाठी तिच्या घरी येत होता. सध्या ती बारावीच्या वर्गात असून. जानेवारी 2015 ते 18 जून 2016 या कालावधीत त्याने तिला विटावा येथील घरी बोलवून तिच्यावर अत्याचार केला. येत्या काही दिवसांमध्ये आपण लग्न करू, तसेच 'मी तुला बारावीची पुस्तकेही मोफत देईल', असेही त्याने तिला अमिष दाखविले. या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी त्याने धमकीही दिली.
मधल्या काळात तो तिला घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे पुण्यात गेला, तिथेही त्याने तिच्याशी चाळे केले. मुलीला तो पुण्याला घेऊन गेल्यानंतर पालकांना त्याच्यावर संशय बळावला. त्यांनी तिच्या अपहरणाची तक्रार 17 जून रोजी कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुक्तार बागवान यांनी त्याच्या शोधासाठी पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र भामरेंच्या पथकाने त्याला पुणे रेल्वे स्थानकातून 18 जून रोजी ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. जाधव हे अधिक तपास करीत आहेत.