ऑनलाइन लोकमतइंदापूर, दि. 22- वाळू काढण्याच्या कारणावरून व्यावसायिकांच्या दोन गटांत श्रीक्षेत्र नीरा नृसिंहपूर येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या सशस्त्र हाणामारीत दोघे जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. परस्परांविरुद्ध तक्रारी देण्यात आल्या आहेत. नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजय हनुमंत काळे, हनुमंत पांडुरंग काळे, प्रवीण हनुमंत बोराडे, लखन मारुती जाधव, नागेश बापू काळे, श्रीहरी लक्ष्मण मासुळे, बच्चन दिलीप धोत्रे, नीलेश ऊर्फ मामा जालिंदर कोळी, सागर अण्णा मासुळे (सर्व रा. नीरा नृसिंहपूर, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. श्रीहरी मासुळे, नीलेश कोळी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इंदापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश कोळी व हनुमंत काळे यांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. बच्चन धोत्रे, सागर मासुळे वगळता इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (दि. २१) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नीरा नृसिंहपूर गावचा माजी सरपंच असणारा आरोपी हनुमंत काळे हा त्याचा मुलगा अजय काळे,लखन जाधव, नागेश काळे, प्रवीण बोराडे यांच्या समवेत भीमा नदीवरच्या शेवरे गावाकडे जाणाऱ्या बंधाऱ्याजवळ वाळू काढत होते. नीलेश कोळी हा राहुल धोत्रे, सागर धोत्रे, नीलेश भोसले, स्वप्नील शिरसट, हरिदास मासुळे यांच्या समवेत तेथे गेला. वाळू काढल्यामुळे बंधारा फुटून पाणी वाहून जाते. त्यामुळे वाळू काढू नका, असे कोळी याने काळे यास सांगितले. त्यावर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. अजय काळे याने शिवीगाळ करीत, आता तुम्हाला खलासच करतो असे म्हणत, जवळच्या तलवारीने कोळीबरोबर आलेल्या श्रीहरी मासुळे याच्या डोक्याच्या मागील बाजूवर वार केला. हनुमंत काळे याने त्याच्या व्हिस्टा कार (क्रमांक एम. एच. ४२/ ४७४७) मधून तलवार काढली. कोळी याच्या कमरेवर तलवारीने वार केले. जाधव, नागेश काळे, प्रवीण बोराडे यांनी कारमधील काठ्या व लोखंडी गज काढून कोळी व त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हनुमंत काळे याने उलट्या तलवारीने राहुल धोत्रे यास मारले. नागेश काळे याने प्रकाश मासाळ यास लोखंडी रॉडने हातावर मारहाण केली. आरडाओरडा झाल्यानंतर गावातून आलेल्या मनोज मासुळे, विठ्ठल धोत्रे, धनंजय पवार यांनी ही भांडणे सोडवली, असे नीलेश कोळी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हनुमंत काळे याने दिलेल्या फिर्यादीत तो वाळू काढत होता, असे त्याने कबूल केले आहे. आपण वाळू काढत असताना, गावातील श्रीहरी मासुळे, बच्चन धोत्रे, मामा कोळी, सागर मासुळे हे तेथे आले. वाळू काढायची नाही, असे सांगून ते शिवीगाळ करू लागले. हाताने मारहाण करू लागले. आपण व आपला मुलगा अजय त्यांना समजावून सांगत होतो. तथापि, काहीही ऐकून न घेता, श्रीहरी मासुळे व मामा कोळी यांनी जवळच असणाऱ्या त्यांच्या घरातून तलवार व लोखंडी रॉड आणले. मासुळे याने आपल्या डाव्या खांद्यावर तलवारीने वार केला, तर कोळी याने आपल्या मुलाच्या डोक्यात मध्यभागी लोखंडी रॉड मारला. बच्चन धोत्रे याने मुलाच्या डोक्यात दगड फेकून मारला. सागर मासुळे याने आपल्या व्हिस्टा कारच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडल्या. त्यानंतर ते जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले,असे काळे याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे अधिक तपास करीत आहेत. वाळूउपशाला आरोपीचे संरक्षण ?यातील फरारी आरोपी बच्चन धोत्रे हा कालठण नं. १ चा रहिवासी आहे. त्याने वाळूउपशाला संरक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मध्यंतरी कालठण येथे वाळू कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या वार्ताहरास त्याने बेदम मारहाण केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्षवाळूउपशामुळे पुरातन अशा लक्ष्मीनृसिंह मंदिरास धोका पोहोचत आहे. त्यामुळे तेथे वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास सक्त सूचना केल्या आहेत. ग्रामपंचायतीने ही वाळूउपसा होऊ नये, असा ठराव केला आहे. मात्र, या घटनेमुळे वाळू व्यावसायिक कुणालाही जुमानत नाही हे स्पष्ट झाले आहे.
वाळू व्यावसायिकांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी
By admin | Published: June 22, 2016 5:50 PM