मुंबई -मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले.सकाळी सात पासूनच मतदार केंद्रावर मतदारांनी मतदानास सुरवात केली.सकाळ पासूनच मतदान केंद्रावर नेहमीपेक्षा गर्दी दिसत होती.
मुंबई शिक्षक मतदारसंघांमध्ये एकूण पाच उमेदवारांची कसोटी लागणार आहे. १३३१४ मतदार असलेल्या या मतदार संघात तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे हे रिंगणात आहेत. तर उद्धव सेनेचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे सेनेचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक ही चुरशीची होणार आहे.
पदवीधर मतदार संघामध्ये उद्धव सेनेचे अँड. अनिल परब आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण शेलार यांच्या मध्ये सरळ सामना होणार आहे. या मतदार संघात ८९९२८ पदवीधर मतदार आहेत.गेली अनेक वर्ष पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आणि यावर्षी तो आपल्याकडे खेचण्याचा चंग बांधला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांनी कंबर कसली होती. शिक्षक मतदारसंघांमध्ये सातत्याने १८ वर्ष प्रतिनिधीत्व केलेले आमदार कपिल पाटील यांनी आपली उमेदवारी आपले सहकारी सुभाष मोरे यांना दिली आहे.
शिक्षक भरतीचे अनेक कार्यकर्ते आज सकाळपासून आपल्या नेमून दिलेल्या बुथवर मंगेश नलावडे, शारदा गायकवाड, हेमंत फडतरे पौर्णिमा परळकर ही शिक्षक भारतीची टीम मुंबई उपनगरात कार्यरत होते.तर उद्धव सेनेचे सर्व आमदार,विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख प्रचार यंत्रणेत सहभागी झाले होते. युवा सेना विभाग अधिकारी रमेश वांजळे, उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड, अँड अनिल परब यांचे विश्वासू नेते संजय कदम, यलप्पा कुशालकर, यांची टीम अँड.अनिल परब व ज. मो. अभ्यंकर यांच्यासाठी सकाळ पासून कार्यरत होती.
या भारतीय जनता पक्षाचे उपनगरातील आमदार अतुल भातखळकर,भाजप विधानपरिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर,आमदार योगेश सागर,आमदार अमित साटम,आमदार अँड.पराग अळवणी,आमदार डॉ.भारती लव्हेकर, आमदार मनीषा चौधरी,आमदार सुनील राणे,आमदार विद्या ठाकूर,तर शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे,माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत आदी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळ पासूनच मतदार केंदावर तळ ठोकून होते.
मतपत्रिका मतपेटीत बंद झालेल्या आहेत. एक जुलैला मतपेटीतील निकाल जाहीर होईल. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.