पुणो : राज्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे, स्थानिक बाजारपेठादेखील आता आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) युरोपातील ट्रॅव्हल एजंटांना आमंत्रित केले असून, ते राज्यातील मुंबई, पुणो, नागपूर, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्याला भेट देणार आहेत.
राज्याला नयनरम्य समुद्रकिनारा, नैसर्गिक वैविध्य असलेली वने, ऐतिहासिक ठिकाणांचा वारसा लाभला आहे. मात्र, योग्य प्रसिद्धीअभावी पर्यटनात राज्य मागे पडत होते. त्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून एमटीडीसीने पर्यटनवाढीसाठी विविध योजना आखल्या आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच स्थानिक रोजगाराला चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याअंतर्गत फ्रान्स, इटली, जर्मनी व युनायटेड किंगडम (यूके) येथील वीस ट्रॅव्हल एजंट भारतात आले असून, येत्या 17 सप्टेंबर्पयत ते विविध स्थळांना भेटी देणार आहेत. यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी अशा विविध ठिकाणांना भेट देतील. त्यानंतर पुण्यातील शनिवारवाडा, राजा केळकर संग्रहालय, तुळशीबाग तसेच शहरालगतच्या काही ठिकाणांना देखील भेट देतील. नागपूरमधील दीक्षाभूमी, ताडोबा अभयारण्य, जंगल सफारी, झीरो माईल ठिकाण, अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच स्थानिक आदिवासी संस्कृतीची देखील ते माहिती घेणार आहेत. औरगांबादमधील अंजठा वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बिबी का मकबरा जगप्रसिद्ध स्थळांचीदेखील ते रपेट मारणार आहेत. (प्रतिनिधी)
पर्यटनस्थळाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक राज्य विदेशी पर्यटकांना आकर्षित करत आहे. प्रथमच राज्याने अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केला आहे. विदेशी ट्रॅव्हल एजंटांना पर्यटनस्थळांची माहिती दिल्यास, ते त्यांच्या देशातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र टूर पॅकेज देऊ शकतील. त्यामुळे राज्यातील पर्यटनवाढीस चालना मिळेल. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे आंतरराष्ट्रीय नकाशावर येतील.
- वैशाली चव्हाण, एमटीडीसीच्या पुणो
विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक