अकोला: घरगुती वादातून शेतजमिनीचा हिस्सा मिळाला नसल्याने, उद्विग्न झालेल्या पातूर तालुक्यातील शिर्ला येथील एका शेतकर्याने सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शिर्ला येथील अशोक डिगांबर इंगळे (४५) यांच्या वडिलांकडे साडेआठ एकर जमीन आहे. जमिनीच्या हिस्से वाटणीत अशोक इंगळे यांच्या नावावर केवळ २५ गुंठे शेती देण्यात आली, तर उर्वरित शेती त्यांच्या चार सावत्र भावांच्या नावावर करण्यात आली. जमिनीचा हिस्सा कमी मिळाल्यावरून गेल्या काही दिवसांपासून अशोक इंगळे यांचा घरगुती वाद सुरू होता. वारंवार मागणी करूनही जमिनीचा हिस्सा मिळत नसल्याने, जमिनीचा हिस्सा देण्यात यावा, अन्यथा १७ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकारी आणि पातूर पोलिसांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यामुळे पातूर पोलीस शोधात असतानाच, त्यांना चकमा देत, अशोक इंगळे यांनी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मुलगा सिद्धार्थ इंगळे व पातूर पोलिसांनी त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात हलविले. सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शेतक-याने घेतले विष
By admin | Published: August 18, 2015 1:31 AM