अकोला, दि. १६- पश्चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर म्हणून ओळखल्या जात असलेल्या येथील सवरेपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने रविवारी कळस गाठला. तापाने आजारी असलेल्या रुग्णास चक्क विष प्राशन केलेल्या रुग्णाचे इंजेक्शन देण्याचा प्रकार येथे रविवारी सकाळी घडला. यामुळे तापाने आजारी असलेल्या तरुणाची तब्येत बिघडल्याचा आरोप रुग्णाच्या आईने केला आहे.तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर येथील ज्ञानदेव काशीराम बोदळे (५0) यांनी विष प्राशन केल्यामुळे त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयातील वार्ड क्र. ६ मध्ये शुक्रवारपासून उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्थानिक इराणी झोपडपट्टी भागातील सय्यद जमीर सय्यद वजीर या तापाने आजारी असलेल्या रुग्णास शनिवारी रात्री २ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला ज्ञानदेव बोदळे यांच्या शेजारच्या खाटेवरच भरती करण्यात आले. रात्री उपचार केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असतानाच, सकाळी ७ वाजता वार्डात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांपैकी एकाने काशीराम बोदळे या विष प्राशन केलेल्या रुग्णासाठी असलेले इंजेक्शन सय्यज जमीर सय्यद वजीर या तरुणास दिले. यामुळे त्याची तब्येत बिघडली. याबाबत त्याची आई शाहिदाबी यांनी डॉक्टरांना सांगितले; मात्र सुरुवातीला त्यांनी याकडे कानाडोळा केला. हा प्रकार इतरांना माहीत झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केले. उपचारानंतर सय्यज जमीर सय्यद वजीर याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तापाच्या रुग्णाला दिले विष प्रतिरोधक इंजेक्शन !
By admin | Published: October 17, 2016 2:45 AM