नांदेड : लोहा तालुक्यातील जानापुरी येथील शेतकरी माधव दिनाजीराव कदम यांनी दुष्काळी अनुदान वाटपात शासनाने अन्याय केल्याचा आरोप करीत बुधवारी मुंबईत मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. कदम यांना पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सोनखेडचे (ता. लोहा.) सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.कदम यांना जानापुरी येथे ९ गुंठे कोरडवाहू जमीन आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सरसकट ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले आहे. त्यातून कापूस आणि हळद वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती तुटपूंजे अनुदान येत असल्याचे कदम यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना सांगितले.तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमाबाबत त्यांना माहितीही दिली होती. परंतु त्यावर कदम यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर ते मंगळवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मंत्रालयासमोर त्यांनी सोबत आणलेले विष प्राशन केले. ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी कदम यांना रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)