लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारा कामगार लवकरच देशव्यापी बेमुदत संप पुकारण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीतील संसद मार्गावर सुरू असलेल्या कामगारांच्या ठिय्या आंदोलनात, सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी देशव्यापी संपाची तयारी सुरू करण्याची घोषणा केली आहे. कामगार वर्गाच्या विविध १२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून, याच मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगार वर्ग संपात उतरण्याची शक्यता आहे.कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार कामगारांच्या प्रश्नांबाबत उदासीन दिसत आहे. सरकारने घेतलेले निर्णय पाहता, केवळ बड्या भांडवलदारांसाठीच सरकार काम करत असल्याचे दिसते. कामगारांना किमान वेतन म्हणून १८ हजार रुपये, कंत्राटी कामगारांना ‘समान कामाला समान वेतन’, पेन्शन आणि बेरोजगारांच्या हाताला काम, याबाबत अद्यापही सरकारकडून ठोस पावले उचलल्याचे दिसत नाही. याउलट कामगारांच्या हिताचे कायदे मोडीत काढून, सरकार भांडवलदारांच्या दृष्टीने फायद्याचे कायदे तयार करत असल्याने बेमुदत संपाशिवाय दुसरे हत्यार नसल्याचे कराड यांनी सांगितले.
संघर्ष करूराज्य सरकारने कामगार कायद्यात प्रस्तावित बदल करण्याच्या घोषणेला राष्ट्रीय मिल मजदूर संघाने विरोध केला आहे. संघाचे अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले की, औद्योगिक कायदा १९४७ मध्ये प्रस्तावित बदल करून, नुकसान भरपाई, ले-ऑफ किंवा कारखाना बंद करण्यासाठी लागणारी १00 कामगारांची अट आता ३00पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात सरकार मांडणार आहे. मालकांना फायदेशीर ठरणार्या आणि कामगारांना बेरोजगार करणार्या या बदलाविरोधात संघटना कडाडून संघर्ष करेल.