मुंबई : देशातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने माघार घेतली आहे. त्यामुळे सरकारी कामकाजावर संपाचा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. तरी आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची चिन्हे असल्याने सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.संपातून माघार घेत असलो, तरी संपाला नैतिक पाठिंबा राहील, अशी भूमिका बुधवारी महासंघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी यांनी स्पष्ट केली. त्यामुळे संपाचा म्हणावा तितका परिणाम राज्यात दिसणार नाही. कामगार कायद्यातील बदलाबाबत राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे. शिवाय महासंघाचे केंद्रीय प्रतिनिधी संसदेमध्ये यासंदर्भात जाब विचारणार आहेत. तोपर्यंत संपाची आवश्यकता नसल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही संपात सहभागी होणार नसल्याचे संघटनेचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी म्हटले आहे. कामगार कायद्यांत कामगारविरोधी बदल करणे बंद करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला आयटकने पाठिंबा दिला आहे. यासोबत महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी आयटकने केली आहे. (प्रतिनिधी)बँक कर्मचारीही संपावरसार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील बहुसंख्य कर्मचारी संघटना शुक्रवारच्या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याने या बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही बँकांनी ग्राहकांना संदेश पाठवून याची कल्पनाही दिली आहे. कोण कोण होणार सामील?देशव्यापी संपामध्ये देशातील ११ केंद्रीय कामगार संघटना, केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे महासंघ, बँक, विमा, संरक्षण आदी क्षेत्रांतील कामगारांचे अखिल भारतीय महासंघ आणि अन्य क्षेत्रांतील काम करणाऱ्या कामगार संघटना सामील होणार आहेत. यांमध्ये राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही समावेश आहे.
कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप
By admin | Published: September 02, 2016 6:37 AM