ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 31 - पोळा म्हणजे सर्जा-राजाचा सण. वर्षभर मातीत राबणाऱ्या मुक्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणानिमित्त वराडसीम हे अख्खे गाव गोळा झालं आहे. कुणाचा बैल पोळा फोडणार याचीच शर्यत शेतक-यांमध्ये पाहायला मिळते. अडीच बाय तीन फुटांच्या गावाच्या प्रवेशद्वाराच्या खिडकीतून बैल कुदवून पोळा फोडण्याचा आगळीवेगळी परंपरा इथं पाळली जाते.
जवळपास २०० वर्षांपूर्वी नारायण पाटील या शेतकऱ्याने स्वखर्चाने गाव दरवाजा उभारला आहे. पोळ्याच्या सणाला अडीच बाय तीन फूट आकारांच्या दरवाजाच्या खिडकीतून बैल कुदवून पोळा फोडण्याची अनोखी परंपरा सुरू झाली, ती आजतागायत कायम आहे.पोळ्याच्या दिवशी दुपारी १२ वाजेपासून शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.
गाव दरवाजाजवळ शेतकरी आपापल्या बैलांना आणतात. यंदाचा पोळा कुणाचा, बैल फोडणार का याबाबत उत्सुकता असते. जो तो दरवाजातून आपलाच बैल कसा बाहेर पडेल, याचा प्रयत्न करीत असतो. दुपारी तीन वाजेच्या सुमारास गाव दरवाज्याच्या खिडकीचे प्रवेशद्वार उघडण्यात येते. ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल, त्याचा गौरव केला जातो व गावातून बैलाची मिरवणूक काढली जाते.