मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रथा, परंपरांचा दाखला देत भाजपने माघार घेतली असली तरी २०१९ नंतर झालेल्या तीन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत या परंपरेचा विसर भाजपला पडला होता, हे स्पष्ट होते.
आधीच्या तिन्ही निवडणुकांत निधन झालेल्या आमदारांचे अगदी सख्खे नातेवाईकच भाजपच्या विरोधात उभे होते; पण भाजपने माघार घेतली नाही. उलट या तिन्ही निवडणुका भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या. त्यापैकी एका जागेवर भाजपला यशदेखील मिळाले; पण दोन जागांवर दारुण पराभव पत्करावा लागला होता. सर्वात आधी आ. भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यांचे पुत्र भगीरथ हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली. भालके ३,७३३ मतांनी पराभूत झाले. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ १०५ वरून १०६ झाले.
देगलूर (जि. नांदेड) येथील रावसाहेब अंतारपूरकर (काँग्रेस) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र जितेश यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. भाजपने शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. पण अंतापूरकर ४१,९३३ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. नंतर चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली. तिथेही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली; पण जयश्री जाधव १९,२१० मताधिक्याने जिंकल्या.
परंपरा पाळल्याचीही उदाहरणे
- राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव (जि. सांगली) मतदारसंघात एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्या विरोधात भाजपसह कोणत्याही प्रमुख पक्षाने उमेदवार दिला नव्हता. अपक्ष रिंगणात कायम राहिले आणि सुमनताई एक लाख १२ हजारांवर मतांनी जिंकल्या होत्या.
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र विश्वजित काँग्रेसचे उमेदवार होते. तेव्हा भाजप व इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने ते बिनविरोध विजयी झाले होते.
- भाजपचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी जिंकल्या. काँग्रेसचे अशोक पाटील त्यांच्या विरोधात लढले होते.
- यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तत्कालीन आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर (काँग्रेस) जिंकल्या. तेव्हा भाजपचे सध्याचे आमदार मदन येरावार हे उमेदवार होते.
अंधेरी पोटनिवडणूक-भाजपच्या माघारीपर्यंतचा घटनाक्रम
- ३ ऑक्टोबर, २०२२ - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर.
- ५ ऑक्टोबर - दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन.
- ७ ऑक्टोबर - धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांचा दावा, निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल.
- ८ ऑक्टोबर - धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव निवडणूक आयोगाने गोठवले.
- ९ ऑक्टोबर - उद्धव ठाकरे गटाकडून तीन चिन्हे आणि तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाला सादर.
- १० ऑक्टोबर - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव
- ११ ऑक्टोबर - निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता. ‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह प्रदान
- १२ ऑक्टोबर - ऋतुजा लटकेंना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी जाहीर. लटकेंच्या नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेने रोखला. लटकेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव.
- १३ ऑक्टोबर - लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर.
- १४ ऑक्टोबर - लटके व पटेल यांचे अर्ज दाखल.
- १६ ऑक्टोबर - पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत राज ठाकरेंचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र, शरद पवारांचेही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन, प्रताप सरनाईकांचेही पत्र
- १७ ऑक्टोबर - मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे.