नाशिक : नमाजपठणासाठी लागणाऱ्या टोप्यांचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहे. रमजान पर्वनिमित्त मुस्लीम बहुल भागात बाजारपेठ बहरली असून, इस्लामी टोप्या, अत्तराला नागरिकांकडून खास पसंती दिली जात आहे.रमजान पर्व काळात समाजबांधवांकडून अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी दिला जातो. निर्जळी उपवास करण्याबरोबरच नमाज, कुराणपठणावरही भर दिला जातो. नमाजासाठी टोपी आवश्यक असल्यामुळे मुस्लीमबांधवांकडून टोप्यांची खरेदी केली जात आहे. रमजाननिमित्त बाजारात टोप्यांचे विविध प्रकार उपलब्ध असून, आकर्षक बनावटीच्या टोप्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात काही नवीन प्रकारच्या टोप्या आल्या आहेत. पांढऱ्या धाग्यापासून तयार केल्या जाणाऱ्या पारंपरिक टोपीबरोबरच विविध प्रकारच्या कडक कपड्यात बनविलेली आणि त्यावर मोती किंवा बारिक नक्षीकाम असलेल्या टोप्याही विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. तरुणाईकडून टोप्यांचे नवीन प्रकार पसंत केले जात आहेत. तसेच अत्तराचेही विविध प्रकार बाजारात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टोप्या, अत्तरांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुलाब, मोगरा, काबा, जन्नतूल फिरदोस, पॉण्डस्, हॅवाक, नाजनीन, चमेली आदि प्रकारांच्या अत्तराला मागणी अधिक आहे. जुने नाशिक परिसरातील दूध बाजार, खडकाळी, बडी दर्गा, चौकमंडई आदि भागांत इस्लामी साहित्य विक्रीची सर्वाधिक दुकाने आहेत. टोप्या, अत्तर, धार्मिक पुस्तके, ग्रंथ आदिंना मागणी रमजानकाळात वाढली आहे.