भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते भोसरीदरम्यान अवैध चोरटी वाहतूक होत आहे, असे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिल्याने अवैध वाहतुकीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते भोसरीदरम्यान सर्रास अवैध वाहतूक होत आहे. तसेच या महामार्गावरील इतरही शहरांदरम्यान अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे दररोजचे चित्र आहे. याबाबत गोरे यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधानसभेत, १) पुणे नाशिक महामार्गावर चाकण, भोसरी, आंबेठाण चौक या रस्त्यांवर पॅगो रिक्षातून १२ ते २० माणसांची धोकादायक पद्धतीने अवैध वाहतूक केली जात असल्याचे जानेवारी २०१६ वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय, २) असल्यास, अवैध वाहतूक बंद करून जीवित हानी टाळणेकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिवहनमंत्री यांना दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ रोजी वा त्या सुमारास निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय, ३) असल्यास, अवैध वाहतूक बंद करण्यास शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, ४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्या मुद्द्याच्या उत्तरात १) हे खरे नाही. तरीही नमूद मार्गावर पॅगो रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलीस ठाणे, तसेच वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते, असे उत्तर दिले. परिवहनमंत्र्यांना निवेदन दिल्याचे त्यांनी मान्य केले. (वार्ताहर)प्रश्नाच्या तिसऱ्या मुद्द्यावर त्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर चाकण, भोसरी, आंबेठाण चौक येथे पॅगो रिक्षा विविध ठिकाणांहून चोरटी प्रवासी वाहतूक करतात. अशा चोरट्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅगोंवर पोलिसांकडून, तसेच परिवहन विभागाकडून वारंवार दंडात्मक व निलंबनात्मक कारवाई केली जाते . अवैध खासगी वाहतूकदारांकडून छुप्या पद्धतीने चालणाऱ्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याबाबत १४- १- २०१६ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत, असे उत्तर दिले.
महामार्गावरील चोरटी वाहतूक चव्हाट्यावर
By admin | Published: April 29, 2016 2:02 AM