मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अमर महल उड्डाणपुलाचे काही सांधे अचानक तुटल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणारी वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात आल्याने, पूर्व द्रुतगती महामार्गासह सायन-पनवेल मार्ग वाहतूककोंडीमुळे ठप्प झाला आहे. याचा फटका मुंबईकरांसह सर्वच प्रवाशांना बसत आहे. तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक अमर महल उड्डाणपुलाखालून वळवली आहे. मात्र, अमर महल उड्डाणपुलाखालील रस्ता अगदीच लहान असल्याने, सध्या येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. (प्रतिनिधी)पुलाच्या दुरुस्तीला विलंब- ज्या कंपनीने या पुलाची बांधणी केली होती, त्या कंपनीने सध्या पुलांच्या बांधणीचे काम बंद केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने, दुसऱ्या एका कंपनीला या पुलाची माहिती दिली. त्यानुसार, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असून, त्यावर काय उपाय करता येईल? याबाबत दोन दिवसांत ते बांधकाम विभागाला कळवणार आहेत.तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात टेकू देण्यात आला असून, केवळ ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुलावरून सुरू आहे, तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.मुंबईतून ठाणे, नाशिक, आग्रा येथे जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर केला जातो. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. आता या समस्येमुळे वाहनांच्या रांगा सायनपर्यंत लागत आहेत.वाहतूक पोलिसांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी काही वाहनांना सायन-पनवेल मार्गाचा वापर करण्याची विनंती केली आहे. मात्र, वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या.- तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली.त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या.वाहतूककोंडीमुळे नागरिकांना त्रास होणार आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.- राजेंद्र पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चेंबूर
अमरमहल पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ठप्प
By admin | Published: April 11, 2017 1:32 AM