पोलादपूर : महाड-भोर मार्गावरील वरंध घाटात भोर तालुक्यातील हद्दीमध्ये हिंडोशीनजीक तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. महाड-जळगाव ही बस सकाळी सहा वाजता महाड स्थानकातून सोडण्यात आली. घाटमार्गावर असलेली बस सकाळी सात वाजता हिंडोशीनजीक पोहोचली असता समोर दरड रस्त्यावर आल्याचे बस चालकाचे निदर्शनास आले. अपघाताची भीती असल्याने चालक वसंत बढे यांनी बस पुढे नेण्यास नकार देत बस सुरक्षित ठिकाणी नेली व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला. यावेळी लवकरच जेसीबी पाठवण्यात असून घटनास्थळी पोहचत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कळेशी-पुणे व महाड-पुणे या दोन बसही येथे पोहोचल्या त्यांना पुढे दरड कोसळल्याची माहिती देत सुरक्षित ठिकाणी उभ्या करण्यास सांगण्यात आले. बस चालकांनी देखील येथेच बस थांबवल्या. दरम्यान अन्य खाजगी वाहने देखील पोहचत होती. मात्र बराच वेळ उलटूनही जेसीबी न आल्याने वाहतूक कोंडी वाढली. भोरकडून येणाऱ्या मार्गावर अन्य दोन ठिकाणी दरड कोसळल्याने अर्धा दिवस काम चालण्याची शक्यता असल्याने येण्यासाठी उशीर लागेल असे सांगण्यात आले. दरम्यान, दरड हटविण्याचे कामात खूप वेळ लागणार असल्याची माहिती प्रवाशांना मिळताच प्रवाशांनी बस पुन्हा महाड स्थानकात नेण्याची मागणी वाहन चालकाकडे केल्याने बढे यांनी महाड स्थानकात फोन करून संपर्क साधला त्यांना परत येण्याबाबत विचारणा केली. परवानगी मिळताच कळेशी -पुणे व महाड-पुणे या दोन बस मधील प्रवासी घेऊन परत महाडकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या आठवडाभरात पोलादपूरमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मंगळवारी पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
दरड कोसळल्याने वरंध घाटातील वाहतूक ठप्प
By admin | Published: August 04, 2016 2:21 AM