पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर: तारापूर सह परिसरातील सोळा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील सुमारे चौदा हजार वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याकरीता कोट्यवधी रुपये खर्चून पथराळी (तारापूर)येथे उभे केलेले ३३/११ के व्ही उपकेंद्र (सब स्टेशन) मागील दोन वर्षा पासून धूळखात पडून आहे दरम्यान त्या उपकेंद्रामधील कॉपर आयसोलेटरची मोठ्या प्रमाणात चोरी झाली असून अधिकारी, राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी गांधारीच्या भूमिकेत असल्याने हजारो वीज ग्राहकांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे.सध्या या सर्व गावाना तारापूर एमआयडीसीतील १३२/३३ के व्ही उप केंद्रातून टी. ए .पी .एस. कॉलनीतील ३३/११ के.व्ही. उप केंद्राद्वारे फक्त एकाच फिडर वरून वीजपुरवठा होत असून त्याची एकूण लांबी व वीज वाहक तारांचे जाळे सुमारे ६५ कि मि आहे. ही लाईन खूप जुनी व सर्वत्र कमकुवत झाली असून ती किनारपट्टीच्या भागातून जात असल्याने वादळी वाऱ्यांमुळे ती सतत तुटून वीजेचा तासन्तास मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा होत असून वीज ग्राहक वर्षानुवर्षे प्रचंड त्रासाने हैराण झालेले आहेत. त्यापासून वीज ग्राहकांची सुटका करून पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा या करीता देलवाडी सेक्शन च्या अंतर्गत पथराळी येथे महतप्रयत्नाने दोन वर्षा पूर्वी ३३/११ के व्ही क्षमतेचे उपकेंद्र उभे करून तेथे पांच मेगा वॅट एम्पियर (एम व्ही ए) क्षमतेचे दोन मोठे ट्रान्सफार्मर बसवून त्या मधून सहा फीडर काढण्यात आले. त्यापैकी दोन फिडर्स भविष्यकाळातील विजेची मागणी वाढेल किंवा कुठल्या एका फिडरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यास वापरता यावेत म्हणून ते राखीव (स्टँडबाय) ठेवण्यात आले आहेत.तर दांडी, तारापूर, दहिसर, कुरगांव या गावांबरोबरच परिसरातील गावांकरीता हे चार वेगळे फिडर्स काढले असून दांडी फिडर्स वरुन दांडी सह वेंगणी, पथराळी, घिवली, उनभाट, अच्छेळी, तारापूर फिडर्स वरु न तारापूर, कुडण, मोठे कुडण ,माळी स्टॉप, काम्बोडा, दहिसर फिडर्स वरु न दहिसर, नवीन चिंचपाडा, कुडण पाटील पाडा , अक्करपट्टी, पोफरण, जांभळे, भेंडवड, वावे तर कुरगाव फिडर वरून कुरगाव , पांचमार्ग, देलवाडी, पारनाळी नाका पर्यंत अशा वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या फिडर्स वरून वीजपुरवठा करण्याचे नियोजन करून तशा वीज वाहक तारा ही ओढून झाल्या आहेत आता कार्यान्वीत एकच फिडर असल्याने या फिडर वर तांत्रिक दोष निर्माण झाला तर संपूर्ण सोळा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे हजारो ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोच त्याबरोबर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा ही महसूल बुडून त्यांचे लाखो रु पयांचे नुकसान होत आह. पथराळीचे उपकेद्र सुरू झाले तर वेगवेगळे फिडर असल्याने ज्या फिडर्स वर तांत्रिक दोष निर्माण होईल फक्त त्या भागातीलच वीज पुरवठा खंडित झाला तरी दुरुस्तीचे कामही जलद गतीने होईल. हायटेक इंजिनियरिंग या कंपनीने हे उपकेंद्र उभारून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला दोन वर्षा पूर्वी हस्तांतरित केले त्या वेळीच जर राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून ते उपकेंद्र चालविण्यासाठी आॅपरेटर उपलब्ध करून दिला असता तर हजारो वीज ग्राहक जो आज त्रास सहन करावा लागतो आहे. त्यापासून त्याची सुटका झाली असती तसेच लाखो रु पयांचा महसूल ही बुडाला नसता. हे उपकेंद्र हस्तांतरित केल्या नंतर त्वरित का सुरू केले नाही याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन या विलंबाला जे अधिकारी किंवा जी यंत्रणा दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून वीज ग्राहक ग्राम पंचायतीच्या माध्यमातून लवकरच या संदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत .>लवकरच होणार सुरू चोरी झालेले कॉपर चे रॉड बसविण्यांत आले आहेत ब्रेकर रिले तसेच ट्रान्सफार्मर सह सर्व यंत्रणाचे टेस्टींग सुरू आहे लवकरच उपकेंद्र कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत - रुपेश पाटील,उप कार्यकारी अभियंता,बोईसर ग्रामीण उपविभाग
पथराळी वीज उपकेंंद्र दोन वर्षे पडून
By admin | Published: July 10, 2017 3:34 AM