मोहोपाडा : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई मार्गिकेवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरचे काम हाती घेतले आहे. चिखले ब्रिज येथे १८ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजता काम करण्यात येणार आहे.
कामावेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई मार्गिकेवरील सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी व जड अवजड) वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई मार्गिका किमी ५५.००० वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करता येतील.
पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने पनवेल एक्झिटवरून वळवून महामार्ग क्रमांक ४८ वरून करंजाडेमार्गे कळंबोली तर महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ होतील.
मुंबईकडे येणारी वाहने या मार्गे वळवलीपुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने व बस मुंबई लेन किमी ३९.८०० खोपोली एक्झिटवरून वळवून महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करता येतील. पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने ही खालापूर टोलनाका शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किमी ३२.५०० येथून वळवून महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करता येतील.