ठाणे : दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या चालकाने ठाणे महापालिका परिवहन सेवेची बस (टीएमटी) दामटवून ४ वाहतूक पोलिसांना धडक दिली. या अपघातात कासारवडवली वाहतूक उपशाखेच्या पोलीस नाईकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. ही घटना घोडबंदर रोडवर शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी टीएमटी बसचालक गजानन शेजूळ (५६) याला अटक झाली असून, त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वागळे इस्टेट, केणीनगर येथे राहणारा शेजूळ हा बसवाहकाबरोबर शुक्रवारी रात्री काशिमीरा येथून टीएमटी बस घेऊन ठाण्याकडे येत होता. बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. चालक दारू पिऊन तर्रर्र असल्याचे समोर येताच वाहकाशी हुज्जत घालून सर्व प्रवासी तिकिटांचे पैसे परत घेऊन बसमधून उतरले. त्यांच्यासोबत वाहकही उतरला. त्यानंतर शेजूळने ठाण्याच्या दिशेने बस दामटवली. याचदरम्यान, घोडबंदर रोडवरील गायमुख जकातनाक्याजवळ पोलीस नाईक चंद्रकांत वामन साळुंखे (४४) हे आपल्या सहकाऱ्यांसह वाहतूककोंडी सोडवत होते. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या टीएमटी बसने टेम्पो आणि ट्रकला धडक दिली. या धडकेत साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला; तर सद्दाम मुर्तुझा किण्णीमनी (२३), अरीफ दरेसाव किण्णीमनी (२४) व राजेंद्रसिंग अजितसिंग (३७) जखमी झाले.
टीएमटीच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू
By admin | Published: March 13, 2016 5:07 AM