मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहनांची संख्या आणि त्यामुळे वाहतुकीचे नियमन करताना उडणारी तारांबळ, त्यातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांत होणारी वाढ पाहता, आता वाहतूक पोलिसांसाठी ‘शोल्डर कॅमेरे’ आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांच्या खांद्यावर असतील आणि त्यातून वाहन चालकांचे रेकॉर्डिंग करतानाच, कर्तव्यावरील पोलिसांच्या कामकाजावरही लक्ष राहील. मुंबईत सध्या २८ लाखांहून अधिक वाहने धावतात. दिवसाला ५५० नवीन वाहनांची नोंद होत असून, गेल्या काही वर्षांत वाहन संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी, पार्किंग समस्यांबरोबरच विविध प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे, तर अपघातही वाढताना दिसतात. २०१२ साली १५ लाख केसेस वाहतूक नियम उल्लंघनाच्या झाल्या होत्या. हाच आकडा आता १७ लाख २९ हजारांपर्यंत गेला.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चांगलाच चाप बसावा आणि वाहतूक पोलिसांच्या कामातही पारदर्शकता यावी, यासाठी सीसीटीव्ही चलानद्वारे कारवाईस सुरुवात झाली. आता त्याच्या जोडीला आणखी एक यंत्रणा आणण्यात येत आहे. त्यानुसार, कर्तव्यावरील पोलिसांच्या खांद्यावर रेकॉर्डिंग कॅमेरा बसवण्यात येईल. त्याद्वारे समोरून येणाऱ्या वाहनांचे रेकॉर्डिंग होईल. रेकॉर्डिंगचा नियमित पाठपुरावा होईल. नियम मोडणारा चालक न थांबल्यास त्याचेही रेकॉर्डिंगही होईल. त्यामुळे पुढील कारवाई करणे सोपे होईल. सध्या शासनदरबारी हा प्रस्ताव असून, कॅमेऱ्यांच्या आकाराबाबतचा अभ्यास सुरू आहे. (प्रतिनिधी)- कॅमेऱ्यांची संख्या निश्चित झालेली नाही. कॅमेरे कोणत्या आकाराचे असावेत, यावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांसाठी आता ‘शोल्डर कॅमेरे’
By admin | Published: April 11, 2017 1:35 AM