ठाणे : ठाणे महापालिकेने ठाणे आणि कळव्याला जोडणारा कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल गुरुवारपासून वाहतुकीकरिता बंद केल्याने या परिसरात शुक्रवारी न भुतो न भविष्यती अशी वाहतूक कोंडी झाली. ठाणे-बेलापूर मार्गावर विटाव्यापर्यंत तर जुन्या मुंबई-पुणे मार्गावर सह्याद्री सोसायटीपर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्या होत्या. या कोंडीमुळे कळव्यातील रहिवासी अक्षरश: हैराण झाले होते. दुपारनंतर या भागातील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. त्याचबरोबर कल्याण-शीळ मार्गावरही वाहतूककोंडी झाल्याने अनेक वाहने अडकून पडली होती.मुंबई-गोवा मार्गावर महाडनजीक सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर ठाणे-कळवा पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल येत नाही, तोपर्यंत हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु, हा पूल बंद झाल्याने आता बाजूच्या नवीन पुलावरून होणारी वाहतूक वाढल्याने आणि पुढे आणखी नव्या पुलाचे काम सुरू असल्याने येथील रस्त्यावरील वाहतूककोंडीत भर पडली आहे. ठाणे आणि कळवा या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल आहेत. हे दोन्ही पूल या शहरांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. त्यापैकी एक पूल ब्रिटिशकालीन आहे, तर दुसरा २० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन पूल १५० वर्षे जुना असून त्याचे आयुर्मान संपले आहे. असे असले तरी या पुलावरून रिक्षा तसेच दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. ठाणे महापालिका प्रशासनाने कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पुलावर सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूकही गुरुवारपासून बंद केली. या पुलावरून वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच दुचाकी वाहनांचा आकडा मोठा असून ही वाहने गुरुवारपासून नवीन खाडीपुलावरून सोडण्यात येत आहेत. यामुळे शुक्र वारी सकाळी म्हणजेच ऐन गर्दीच्या वेळेस या भागात वाहतूककोंडी झाली. रिक्षा आणि दुचाकी अशी दोन्ही वाहने नवीन खाडीपुलावरून सोडण्यात येत असल्यामुळे कळवा पुलावर वाहनांचा भार वाढला. परिणामी, कळवा चौकातील वाहतूक संथगतीने सुरू असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कळवा खाडीपुलापासून ते विटाव्यापर्यंत आणि कळवानाक्यापासून सह्याद्री सोसायटीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कळवा पुलाच्या पश्चिमेस साकेत, कोर्टनाका, सिडको रस्ता अशा मार्गांवरही कोंडी झाली होती. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत होती. (प्रतिनिधी)>ठाणे महापालिका प्रशासनाने कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पुलावर सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूकही गुरुवारपासून बंद केली. यावरून वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांचा आकडा मोठा असून ही वाहने गुरुवारपासून नवीन खाडीपुलावरून सोडण्यात येत आहेत.
ब्रिटिशकालीन कळवा पूल बंद झाल्याने वाहतूक कोंडी
By admin | Published: August 06, 2016 4:44 AM