औरंगाबाद : नारेगाव परिसरात चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या मैदानावर झालेल्या स्फोटात कचरा वेचक महिलेचा जागीच मृत्यू झाला़ गुरुवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. स्फोट नेमका कशाचा झाला हे कळू शकले नाही.
नंदाबाई कडुबा भालेराव (3क्), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नंदाबाई ही कुटुंबियांसह मिसारवाडी परिसरात राहत होती. तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. तिचे पती मिस्त्रीकाम करतात. आई शशिकलाबाईही तिच्या जवळच राहते. या माय-लेकी दिवसभर कचरा वेचून त्यातून मिळणा:या पैशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत गरवारे स्टेडियमपासून काही अंतरावरच असलेल्या मोकळ्या मैदानावर त्या पोहोचल्या. या ठिकाणी कंपन्यांमधील औद्योगिक कचरा आणून फेकला जातो. त्यामुळे या मैदनाला कचरापट्टीचे स्वरूप आलेले आहे. नंदाबाई व शशिकलाबाई या दोघी सकाळी कचरा वेचण्यासाठी मैदानावर पोहोचल्या. पाणी आणण्यासाठी आई शशिकलाबाई जवळच असलेल्या एका कंपनीत गेली आणि नंदाबाई त्या मैदानात कचरा वेचू लागली. कचरा उचलत असताना अचानक भीषण स्फोट झाला. यात तिचा जागीच मृत्यू झाला़ चिकलठाणा वसाहतीतील कोणकोणत्या कंपन्या येथे कचरा आणून फेकतात, याचाही तपास घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सर्वच यंत्रणा हादरली
च्नारेगावात झालेल्या या भीषण स्फोटानंतर अख्खी यंत्रणा हादरून गेली आहे. कारण हा स्फोट नेमका कशाचा झाला हे तर अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु स्फोटाची तीव्रता बॉम्बसारखीच आहे. त्यामुळे हे दहशतवादी कृत्य तर नाही ना? असा संशय असून, या स्फोटाचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहे.
च्काही दिवसांपूर्वीच गरवारे स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती. सभेच्या वेळी घातपाताचा इरादा असावा; परंतु तो सफल झाला नाही म्हणून स्फोटके येथे कचरापट्टीत आणून फेकली असावीत, असा संशय पोलीस यंत्रणोला आहे.