सुरेश लोखंडे,
ठाणे- अतिक्रमण वगळता सध्या ५२ एकर जागेत विस्तारलेल्या मनोरुग्णालयाच्या जागेवर ठाणे-मुलुंडदरम्यान रेल्वे स्टेशन उभारण्यास मध्य रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली. रेल्वे आणि ठाणे महापालिका यांच्या या संयुक्त प्रकल्पाला लागणारी १० एकर जागा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून मोफत मिळवण्याच्या हालचालीही जोर धरू लागल्या आहेत. संभाव्य रेल्व स्टेशनची प्रतिकृतीही तयार करण्यात आली आहे. तासी १५ किलोमीटर धीम्या गतीने धावणाऱ्या अप अॅण्ड डाऊन उपनगरीय गाड्यांसाठी रेल्वे स्टेशन उभारण्यास मध्य रेल्वेने सुमारे १३ वर्षांच्या पाठपुराव्यास अनुसरून सहमती दर्शवली आहे. ठाणे व मुलुंडच्या सीमेवर होणारे हे स्टेशन ईस्टर्न एक्स्प्रेस हाय वे, एलबीएस महामार्ग आणि घोडबंदर रोडने जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्याच्या ठाणे स्टेशनवरील साडेसहा लाख प्रवाशांचा बहुतांशी ताण या स्टेशनमुळे कमी होणार आहे; पण या स्टेशनसाठी लागणाऱ्या १० एकर जागेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आरोग्य विभागाचे दरवाजे ठोठावावे लागले असून त्याला हिरवा कंदील दाखवला जात असल्याचे सांगितले जात आहे. समाज व नातेवाइकांपासून दुरावलेल्या मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या या रुग्णालयाचा परिसर एकेकाळी शाप म्हणून ओळखला जात असे. पण, काळाच्या ओघात या रुग्णालयाच्या एका बाजूने विस्तारलेल्या महानगरासाठी ही जागा महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. इंग्रजांनी सुमारे १९०१ साली म्हणजे ११५ वर्षांपूर्वी या रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली. रेकॉर्डनुसार हे मनोरुग्णालय ७२ एकरच्या जागेत आहे. सद्य:स्थितीत कमीअधिक १३०० रुग्ण तरी दररोज वास्तव्याला असतात.रुग्णालयाकडे ५२ एकर जागा शिल्लक आहे. उर्वरित ११ एकर जागेवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण असून महापालिकेची शाळा, गार्डन व नानानानी पार्क आहे. याशिवाय, साधना महाविद्यालय, सैनिकी मुलांचे वसतिगृह, आरोग्य उपसंचालकांचे कार्यालय आणि रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी यांची कॉलनी वसलेली आहे. यापैकी रेल्वे स्टेशनसाठी उपयुक्त व निश्चित केलेल्या १० एकर जागेवरील सुमारे ३०० झोपड्यांच्या बंजारा वस्तीवर ठाणे महापालिकेने जून २०१२ ला कारवाई करून ही जागा आधीच मोकळी केली आहे.>राज्यातील तीन रुग्णालयांचा कायापालट?बंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य व मस्तिष्क विज्ञान संस्थ्या (निमहन्स) या मनोरुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्याच्या या रुग्णालयासह राज्यातील तीन रुग्णालयांचा कायापालट करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने २०११ मध्ये घेतला होता. सुमारे ४०० कोटी खर्चून ठाण्याच्या या रुग्णालयाचा कायापालट बीओटीवर करण्याचे प्रस्तावितही झाले होते. या बदल्यात संबंधित विकासकाला या रुग्णालयाची आठ एकर जागा द्यावी लागणार होती; पण तत्कालीन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी हाणून पाडला होता. हा राग मनात ठेवून आरोग्य विभागाने स्टेशनसाठी प्रस्तावित असलेली ही जागा नाकारू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.