ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 29 - येथील जीटीसी केंद्रामध्ये प्रशिक्षण सुरू असलेल्या होमगार्ड यांना गुरुवारी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करावे लागले. पोटात मळमळ आणि उलटी झाल्याने जवळच असलेल्या रुग्णालयात या होमगार्डवर उपचार करण्यात आले. प्रशिक्षणाच्या मध्यांतरामध्ये चहा घेतल्यानंतर हा त्रास झाल्याचे होमगार्ड रुग्णांचे म्हणणे आहे. सुमारे 62 होमगार्ड यांनाही विषबाधा झाल्याचे रुग्णालयातून कळते. येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामध्ये मागील २३ डिसेंबरपासून होमगार्डयांचे प्राथमिक भरती शिबिर सुरु आहे. गुरूवारी मध्यांतरामध्ये ३ ते ३.३० वाजताच्या दरम्यान या सर्व प्रशिक्षणार्थींनी चहा घेतला. हा चहा घेतल्यानंतर सर्वांना मळमळ झाली. काहींना उलटीही झाली असा त्रास होणाऱ्या सर्व होमगार्ड यांना तात्काळ तेथून जवळच असलेल्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. आता कुणाचीच प्रकृती धोक्यात नाही. या विषबाधेमध्ये एका होमगार्डचाही समावेश आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
प्रशिक्षणार्थी 62 होमगार्ड यांना चहातून विषबाधा
By admin | Published: December 29, 2016 9:12 PM