वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सुहास दिवसे यांच्याविरोधात वाशिम येथे छळाची तक्रार दाखल केल्याचे समजते. वाशिम पोलिसांनी त्यांची तक्रार सध्या चौकशीत ठेवल्याची माहिती आहे.
सोमवारी रात्री उशिरा वाशिम पोलिसांच्या पथकाने पूजा खेडकर यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे तब्बल तीन तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप समोर आला नाही. मात्र, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार दाखल केल्याचे समजते. या संदर्भातच वाशिम पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. या प्रकरणात वाशिम पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ३ जूनला पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण सुरू झाले. मात्र, एक महिन्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कामकाजादरम्यान स्वतंत्र कक्षाची मागणी, आलिशान वाहनावर लाल आणि निळा दिवा लावून फिरणे आदी अनेक कारणांनी त्या चर्चेत आल्या. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून २५ पानी अहवाल अप्पर सचिवांना पाठवण्यात आला. त्यानंतर त्यांची तात्काळ बदली वाशिम येथे झाली होती.
पूजा खेडकर वाशिम जिल्ह्यातून कार्यमुक्तवादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. पूजा खेडकर यांच्या वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षणाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीने महाराष्ट्रातून पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवलं आहे. तसेच, त्यांना मसुरी येथे २३ जुलैच्या आत हजर होण्याचे आदेश मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्याद्वारे दिले आहेत. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला. वाशिम जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील प्रशिक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे.