मुंबई : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून पुढील दोन वर्षांत राज्यात ५८ हजार बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या ३० नामांकित खासगी क्षेत्रातील कंपन्या, प्रशिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. या योजनेचा शुभारंभ गुरुवारी मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झाला. या योजनेसाठी साधारण २०० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, आता ९५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. प्रशिक्षणासाठी किमान ३३ टक्के मुलींची निवड करण्यात येणार आहे. योजनेच्या पुढील टप्प्यात अजून २० हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी प्रशिक्षण संस्थांबरोबर लवकरच सामंजस्य करार करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री पंकजा यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)या योजनेतून सुरक्षा रक्षक, आॅफिस बॉय, पँट्री बॉय, सेवा पुरवठा, हॉस्पिटॅलिटी, रीटेल ट्रेडिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग, फिटर, वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन, शोरूम हॉस्टेसेस, पर्यटन व्यवसाय आदी विविध प्रकारची कौशल्य विकास विषयक प्रशिक्षणे दिली जातील.शनिमंदिर प्रवेशाचा वाद निष्कारणशनिशिंगणापूर येथे महिलांनी चौथाऱ्यावर जाण्याचा वाद निष्कारण निर्माण करण्यात आला आहे. प्रथेनुसार जिथे महिलांना मंदिरात जाण्यास बंदी आहे, त्यात महिलांचा अपमान होतो, असे मला वाटत नाही, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगतिले.माझ्या जन्माच्या आधीपासून शनिशिंगणापूर येथे महिलांना जाण्यास बंदी आहे, पण इतर मंदिरात महिलांना जाता येते.त्यात महिलांचा मान-अपमान आहे, असे मला वाटत नाही. हा प्रथेचा भाग आहे. अनेक गावांत हनुमान मंदिरात महिला जात नाहीत, असे पंकजा यांनी सांगितले. हे पारंपरिक विषय आहेत...यात महिलांचा अपमान होण्यासारखे काय आहे? असा सवालही त्यांनी केला. स्त्रीभ्रूण हत्या, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे यातून खरे तर महिलांचा अपमान होतो. मंदिर प्रवेशासारख्या विषयांवर राजकारण करणे चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या.
५८ हजार बेरोजगारांना प्रशिक्षण
By admin | Published: December 04, 2015 2:05 AM