मुंबई : राज्यातील हजारो शिक्षकांना शिक्षण विभागाने गेल्या वर्षी पाचवी आणि या वर्षी सहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले. मात्र या प्रशिक्षणासाठी देण्यात येणारे मानधन शिक्षकांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हजारो शिक्षकांचे थकीत मानधन तत्काळ देण्याची मागणी शिक्षक परिषदेने प्रकल्प संचालकांकडे केली आहे.याबाबत शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, राज्यात ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रम राबवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षकवर्ग मदत करत आहे. या उपक्रमातील इयत्ता पाचवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना एप्रिल २०१५मध्ये देण्यात आले. सहा दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील हजारो शिक्षकांनी हजेरी लावली. त्याबदल्यात प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दैनिक भत्ता, मार्गदर्शकांचे मानधन व अन्य खर्चासाठी निधी मिळतो. हा निधी केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात मंजूर केला जातो. मात्र प्रशिक्षण आयोजित करणाऱ्या संयोजकांनाच अनुदान मिळाले नसल्याने राज्यातील हजारो शिक्षकही मानधनापासून वंचित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच अनुदान आणि मानधन मिळण्यात विलंब होत असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
वर्ष उलटूनही प्रशिक्षणाचे मानधन नाही
By admin | Published: May 16, 2016 4:38 AM