पिंपरी : महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्यांमध्ये १२८ पैकी ९० जणांना पहिल्यांदाच महापालिकेत कामकाज करण्याची संधी मिळाली आहे. महापालिका हद्दीतील नागरीकरणाचा वेग लक्षात घेता तुलनेने विकास कामाची गती कमी आहे, ही बाब शहराला शिस्त लावून गेलेल्या तत्कालिन महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी निदर्शनास आणून दिली होती. नवख्या नगरसेवकांमार्फत गतिशील कारभार करायचा असेल, तर त्यांना महापालिका कामकाजासंबंधीचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. यशदामार्फत त्यांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भाजपाचे ६५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १८, अपक्ष आणि अन्य पक्षांचे ७ नगरसेवक नवखे आहेत. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अल्पशिक्षित नगरसेवकांचेही प्रमाण अधिक आहे. सध्याच्या नगरसेवकांमध्ये पदवीधर नगरसेवकांची संख्या ३५, असून उच्च पदवीधर आठ जण आहेत. बारावी शिकलेले ३४, तर दहावी शिकलेले १४ नगरसेवक आहेत. नववी शिकलेले तब्बल २८ नगरसेवक असून पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्यांमध्ये सात नगरसेवकांचा समावेश आहे. एका अशिक्षित नगरसेवकानेही महापालिकेत एंट्री केली आहे. गत निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांना अक्षरश: ठरावाचे वाचनही करता येत नसल्याचे सभागृहात निदर्शनास आले आहे. एका नगरसेविकेने सन २०१६ -१७ याचे दोनशे सोळा- सतरा असे वाचन केले होते. (प्रतिनिधी)>अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावरील वर्षाचा उल्लेख असलेले नीट वाचता येत नसेल, तर अर्थसंकल्पातील कोट्यवधींच्या तरतुदींचे वाचन त्यांच्याकडून होईल, ही अपेक्षा फोल ठरते. असा अनुभव यापूर्वी नागरिकांना आला आहे. यापुढे असे अनुभव येऊ नयेत, म्हणून महापालिका सभागृहाचे कामकाज,महाराष्ट्र महापालिका अधिनियम, त्यातील तरतुदी,नियम या विषयीची माहिती नगरसेवकांना देणे आवश्यक आहे. फलश्रुती नसलेल्या दौऱ्यांवर लाखोंचा खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या प्रशिक्षणावर खर्च करणे अपेक्षित आहे, असे नागरिकांनी सुचविले आहे.
नवनिर्वाचितांना प्रशिक्षणाची गरज
By admin | Published: March 03, 2017 1:33 AM