नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ६४०० कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि.५) तीन ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली. सदर प्रशिक्षण कार्यशाळा दोन सत्रांत घेतली जाऊन त्यात मतदानप्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान, तर २३ फेबु्रवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकी पाच कर्मचारी असलेल्या १६०० पथकांची म्हणजेच ८००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील शिपाई वगळून ६४०० कर्मचाऱ्यांना रविवारी मतदानाच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांत घेतले जाईल. त्यात राजे संभाजी स्टेडियममध्ये सकाळ सत्रात १२३२, तर दुपार सत्रात ११३६, कालिदास कलामंदिरात सकाळ सत्रात ९३०, तर दुपार सत्रात ९८५ आणि कर्मवीर गायकवाड सभागृहात सकाळ सत्रात १२९६ तर दुपार सत्रात १२०४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्या-त्या विभागाचे संबंधित निवडणूक अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यात प्रामुख्याने, मतदानप्रक्रिया कशी राबवायची, मतदान केंद्रात पार्टीशन कसे टाकायचे, इव्हीएम मशीन, बॅलेट युनिट कसे हाताळायचे, एकूणच मतदानप्रक्रिया कशी चालेल याविषयी माहिती दिली जाणार आहे. याचवेळी मतदान केंद्राध्यक्ष व सहायक यांना मतदानप्रक्रियेविषयी पुस्तिकेचेही वाटप केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण हे रविवार, दि. १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येणार असल्याचेही फडोळ यांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सर्वांना उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
By admin | Published: February 05, 2017 12:53 PM