अनिकेत घमंडी, डोंबिवलीकोकणात जाणा-या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. जलद गाड्यांसाठीही थांबा असूनही दिव्यात त्या थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे दिव्यातही जलद गती मार्गाची सुविधा मिळणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. इथे अनेकदा रेल्वे फाटकामुळे कॉशन आॅर्डरच्या नावाखाली वेग मंदावण्यात येतो. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी वेळोवेळी स्थानकातील स्वच्छतागृहे, उपाहारगृह, रेल्वे फाटक, गर्दुल्ले, स्वतंत्र तिकीटघर अशा विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या दिवा स्थानकात कोकणात जाणाऱ्या गाड्या का थांबत नाहीत, यावर भर देण्यात आला. केवळ तांत्रिक कारणे पुढे करून या स्थानकात गाड्या थांबविण्यात येत नसल्याचे उत्तर देण्यात आले. आता तर स्थानकातील संबंधित फलाट क्रमांक ५-६ ची लांबी-रुंदी कमी असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ठाणे स्थानकातील फलाटांचीसुद्धा हीच समस्या होती, त्या वेळी दोन हॉल्ट देण्यात येत होते. तसे दिवा स्थानकातही द्यावेत, अशी मागणी आहे. दिव्यात तीन लाख लोकसंख्या आहे. त्यापैकी दीड लाखाहून अधिक रहिवासी हे कोकणातील आहेत. केवळ दिव्यात थांबा नसल्याने त्यांना ठाण्यात अथवा पनवेला जावे लागते. ही स्थिती जिल्ह्यातील ठाणे वगळता दिवा, कळवा, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूरची आहे. दिवा स्थानकात कमी डबे असलेल्या गाड्या थांबवा अणि तांत्रिक कामे पूर्ण झाल्यावर अन्य गाड्या थांबवा. त्यामुळे ठाण्याचा ताण कमी होईल आणि प्रवाशांचीही सोय होईल, असे मत संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी मांडले. ही मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कोकणात जाणा-या गाड्यांना दिव्यात थांबा हवा!
By admin | Published: January 05, 2015 4:47 AM