रेल्वेचा भोंगळ कारभार : डिस्प्ले व उद्घोषिका देतात चुकीची माहिती प्रवीण राय - नागपूरधावपळीच्या या युगात एकेक मिनिट महत्त्वाचा आहे. त्यामुळेच सरकार देशात हायस्पीड बुलेट रेल्वेगाडी चालविण्याच्या तयारीत आहे. जेणेकरून लोकांना कमीतकमी वेळात आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचता येईल. परंतु रेल्वेगाड्यांची लेटलतिफी थांबायला तयार नाही. इतकेच नव्हे तर रेल्वेस्थानकांवर गाड्यांची प्रवाशांना माहिती देण्यासाठी लावण्यात आलेले डिस्प्ले बोर्ड आणि उद्घोषिकासुद्धा गाड्यांच्या वेळांची माहिती चुकीची देत आहे. सोमवारी ही बाब प्रत्यक्ष अनुभवास मिळाली. रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर बेंगळुरू-संघमित्रा एक्स्प्रेस १२२९५ ही रेल्वेगाडी निर्धारित वेळेवर म्हणजे ८.२० वाजता येत असल्याची सूचना डिस्प्ले बोर्डवर सातत्याने दिली जात होती. इतकेच नव्हे तर रेल्वेगाड्यांची माहिती देणारी उद्घोषिकासुद्धा वारंवार गाडी वेळेवर असल्याची माहिती देत होती. सर्व प्रवासी तयारीत होते. ८.२० वाजले तरी गाडी येईना. ८.३० झाले सर्वांनी आपल्या घड्याळी पाहिल्या. परंतु गाडी काही येत नव्हती. डिस्प्ले बोर्ड व उद्घोषिकेची गाडी वेळेवर येत असल्याची सूचना मात्र सातत्याने सुरू होती. तब्बल १८ मिनिटांनंतर गाडी आली. त्यानंतर २२ मिनिटे उशिरा पुढे रवाना झाली. शा वेळी २० मिनिटांचा उशीर हा रेल्वे विभागासाठी उशीर समजला जात नाही का? असा प्रश्न निर्माण होतो. बुलेट ट्रेन दूर राहिली. अगोदर ज्या गाड्या सुरू आहेत, त्या वेळेवर चालवाव्यात, अशी अपेक्षा यावेळी अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
गाड्यांची लेटलतिफी सुरूच
By admin | Published: July 08, 2014 1:15 AM