मुंबई - शिवसेनेतून फुटून शिंदे गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे फुटीर खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा मोठा गट महायुतीत सामील होणार असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा समाचार घेत, गद्दारांना सर्वच गद्दार दिसतात, पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी दगा फटका करून काही लोकांनी वेगळा गट तयार केला. या फुटीरांना महाराष्ट्रातील जनता गद्दार म्हणून ओळखते आणि संबोधते. जातील तिथे या गद्दारांना जनतेच्या संतापाचा सामना करावा लागतो त्यामुळे ते सैरभैर झाले आहे. आपण केलेल्या गद्दारीचे पाप पुसता येत नसल्याने हताश आणि निराश झालेले हे फुटीर लोक दररोज काँग्रेस पक्ष फुटणार अशा वावड्या उठवत असतात. काँग्रेस पक्षात आपल्या विचारधारेशी आणि पक्षनेतृत्वाशी इमानदार असणारे प्रामाणिक नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अशा फुटीर कावळ्यांनी कितीही शाप दिले तरी काही फरक पडणार नाही. राज्यातील जनता सुज्ञ असून आगामी निवडणुकीत ती गद्दारांना त्यांची जागा दाखवेल असा टोला लोंढे यांनी लगावला.