पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात या कंपनीच्या अमेरिकेतील खात्यातून भारतात पैसे ट्रान्सफर झाल्यासंबंधीची सविस्तर माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) मिळविली आहे. हा महत्त्वपूर्ण पुरावा असल्याचा गुन्हे अन्वेषण विभागाचा दावा आहे. पणजी प्रथमवर्ग न्यायाधीशांसमोर घेतलेल्या कबुली जबाबाशिवाय पोलिसांकडे कोणताही पुरावा नसल्याचा दावा संशयितांचे वकील न्यायालयात करीत होते. आता या प्रकरणातील आपली बाजू भक्कम करणारा लेखी पुरावा मिळविल्याचा गुन्हे अन्वेषण विभागाचा दावा आहे.लुईस बर्जर कंपनीच्या मुख्यालयातून म्हणजे अमेरिकेतील न्यूजर्सी कार्यालयातून हे पैसे भारतात कसे पाठविले, हे स्पष्ट करणारे बँकेतील व्यवहारांची माहिती स्प्रेडशीटच्या स्वरूपात गुन्हे अन्वेषण विभागास संबंधित प्राधिकरणाकडून मिळाली आहे. या नवीन घडामोडीमुळे या प्रकरणातील प्रमुख संशयितांची अडचण वाढली आहे. जैका प्रकल्पात या कंपनीकडून केलेल्या कथित लाचखोरी प्रकरणात लुईस बर्जर कंपनीकडून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना लाच दिल्याचा ठपका आहे. चर्चिल व जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर तुरुंगात आहेत. दिगंबर कामत यांनी अटकपूर्व जामीन मिळविल्यामुळे ते अटकेपासून तूर्त बचावलेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनाला गुन्हे अन्वेषण विभागाकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.वाचासुंदरचा जामिनासाठी पुन्हा अर्जआनंद वाचासुंदर यांनी पणजी विशेष न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज केला आहे. यापूर्वी त्यांचे दोन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत.
व्यवहाराची कागदपत्रे गुन्हे अन्वेषण विभागाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2015 1:12 AM