मुंबई : वाहतूक विभागातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक उपायोजना आखल्याचे म्हणत, १३ भ्रष्टाचारी वाहतूक हवालदारांची बदली अन्य विभागात केल्याची माहिती, बुधवारी वाहतूक विभागाने उच्च न्यायालयाला दिली. त्या वेळी दोषी पोलिसांची बदली करणे पुरेसे आहे का? की, आणखी कठोर कारवाई करणे योग्य ठरेल? असा प्रश्न न्यायालयाने केला.वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराबाबत पोलीस दलाच्या शस्त्रास्त्र विभागातील सुनील टोके यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. आर. एम. मोरे व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने वाहतूक विभागाला भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.न्यायालयाने दिलेल्या या निर्देशानुसार, वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले, तसेच मुंबईतील वाहतूक विभागाने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत, त्याच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू करणार का? अशी विचारणाही उच्च न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला केली.
‘दोषी पोलिसांची बदली करणे पुरेसे आहे का?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:13 AM