डिप्पी वांकाणी, मुंबईरायगड जिल्ह्यातील बाळगंगा सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुनील कलगुटकर यांची अखेर रत्नागिरीला बदली करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होता येईल.सिंचन घोटाळ्याचा तपासी अधिकारी कलगुटकर यांनी आपले अपहरण करून एका ठेकेदाराचे बिल (रक्कम) देण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप रायगडचे कार्यकारी अभियंता सुभाष झगडे यांनी केला आहे. झगडे यांनी कलगुटकर यांच्याविरुद्ध मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने यासंबंधी कलगुटकर यांच्याबाबत अहवाल सादर करण्यास एसीबीला सांगितले होते. कलगुटकर यांच्याबाबत त्यांच्या वरिष्ठांनी मानवाधिकार आयोगाकडे नकारात्मक अहवाल दिल्यानंतर कलगुटकर यांना ठाणे कार्यालयातूून वरळी येथील मुख्यालयात हलविण्यात आले होते. आता त्यांची तेथून रत्नागिरीला बदली करण्यात आल्याचे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. यासंदर्भात कलगुटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला बदलीचे आदेश मिळाले आहेत; पण ही बदली अयोग्य असून एसीबीच्या महासंचालकांना तसे मी कळविले आहे.
चौकशी अधिकाऱ्याची बदली
By admin | Published: June 04, 2016 2:55 AM