ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४०८ उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये तब्बल २१७ अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार अन्यत्र बदली करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ५०वर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २१ जणांना कार्यकाळ पूर्ण होवूनही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री बदल्याचे आदेश जारी करण्यात आली.सध्याच्या ठिकाणाहून बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या ४१०वर उपनिरीक्षकांच्या विनंती अर्ज अमान्य करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (१)अन्वये पोलीस अस्थापना मंडळ क्रमांक दोनने राज्यातील विविध पोलीस अधीक्षक, आयुक्तालये आणि अन्य विभागातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९१ पीएसआयच्या बदल्या केल्या आहेत. तर त्याहून जास्त म्हणजे २१७ जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीसाठीचा कार्यकाळ पूर्ण होवूनही वैयक्तिक, कौटुंबिक कारणास्तव सध्याच्या ठिकाणी विनंती केलेल्यापैकी २१ अधिकाऱ्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. ------------मुंबईतील २०० अधिकारी बदलीसाठी इच्छुक सध्याच्या कार्यरत असलेल्या ठिकाणी मुदतवाढ किंवा मुदतपूर्व इच्छुक पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यासाठी प्रयत्नशील ४१० अधिकाऱ्यांच्या विनंती अर्ज अमान्य केलेले आहेत. त्यामध्ये जवळपास निम्मे म्हणजे २०० जण हे मुंबई आयुक्तालयातील आहेत. त्यामुळे कधीकाळी ‘पोस्टींग’साठी प्रयत्नशील असलेल्या मुंबईत पोलीस दलाची क्रेझ आता संपली असल्याचे स्पष्ट होते. बहुंशात पीएसआय हे २५ ते ३० वयोगटातील असून ऐन उमेदीत त्यांना मुंबईत काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी वर्तुणूक, ड्युटी, बंदोबस्ताचा ताण व राजकीय दबाव आदी कारणामुळे हे तरुण अधिकारी मुंबईतून बाहेर जाण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना सध्याच्या ठिकाणी काम करावे लागणार आहे.
राज्यातील ४०८ उपनिरीक्षकांच्या बदल्या !
By admin | Published: May 25, 2017 9:48 PM