राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या काही महिन्यांपूर्वी बदल्या केल्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये एस चोकलिंगम, श्रावण हर्डीकर, शितल उगले-तेली यांच्यासह सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.
जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे एस चोकलिंगम यांची बदली यशदा पुणेच्या महासंचालक पदावर करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे.
याचबरोबर शितल उगले-तेली यांची नागपूरला बदली झाली असून त्यांना नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योगचे पद देण्यात आले आहे. पुण्यात अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त असलेल्या प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.
पनवेलमध्ये भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेखमध्ये असलेल्या अनिता पाटील यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झालेले एन के सुधांशु यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर करण्यात आली आहे.