Maharashtra IAS Transfer: राज्य सरकारनं मंगळवारी १० सनदी अधिकाऱ्यांची बदली केलीय. यामध्ये आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असेलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना अखेर नवी जबाबदारी मिळाली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी आणि पशूसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त सचिव पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. याशिवाय मिलिंग म्हैसकर, डॉ. नितीन करीर यांच्याकडेही नवी जबाबदारी सोपवण्यात आली.
१९९८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन करीर यांच्याकडे वित्त विभाग, मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी होती. तर १९९२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्यय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
याशिवाय मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार यांची महापारेषण विभागाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तर त्यांच्या जागी श्रवण हर्डिकर यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. २००९ च्या बॅचचे अधिकारी जी श्रीकांत आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असतील. तर छत्रपती संभाजी नगर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची छत्रपती संभाजी नगर राज्य कर विभागाचे सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पी शिवशंकर यांच्याकडे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्यांक विकास विभागच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत आणि डी.टी.वाघमारे यांच्याकडे गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीये.