मुंबई : राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. गेल्या दीड वर्षात एकाच अधिकाऱ्याच्या तीन-चार वेळा बदल्या केल्या जात आहेत. पैसे कमवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बदल्यांचा नवा उद्योगच सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. बदल्यांबाबत कायदा अस्तित्वात असतानाही तो पाळला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. या बदल्या का केल्या जात आहेत याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे असल्याचे मलिक म्हणाले. सरकारमधील मंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत म्हणून बदल्या होत आहेत की बेकायदेशीर कामे करण्यास हे अधिकारी तयार होत नाहीत म्हणून त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत याचाही खुलासा झाला पाहिजे असे ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा पैसे कमावण्याचा नवा उद्योग शोधून काढला आहे, असा आरोप मलिक यांनी केला. डाळींचा काळा बाजार करणाऱ्यांना सरकार मदत करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. सरकारच्या गोदामात आत्ताही ७ हजार टन डाळ पडून आहे. ही डाळ रेशनिंग दुकानावर का उपलब्ध करून देत नाहीत असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला आहे. सध्या डाळीचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. डाळ उपलब्ध असतानाही सरकार ती रेशनींग दुकानावर देत नाही. त्यामुळे काळा बाजार करणाऱ्यांचे फावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘अधिकाऱ्यांच्या बदल्या हा तर भाजपाचा नवा उद्योग’
By admin | Published: May 06, 2016 2:17 AM