राजकीय गोंधळ : स्व पक्षाच्या निष्ठा, विचारधारेला उमेदवारांची तिलांजलीनागपूर : २५ वर्षे जुनी युती तुटली आणि आघाडीतही घटस्फोट झाला. राजकीय समीकरण बदलताच कालपर्यंत स्वत:ला पक्षनिष्ठ म्हणणाऱ्यांनीही रंग बदलला. रुसवे- फुगवे, बंडखोरी अन् उमेदवारी मिळेल त्या पक्षात घरठाव करण्याचा सपाटा सुरू झाला. काँग्रेसच्या तिकीटीवर चार टर्म आमदारकी आणि कॅबिनेटमंत्रीपद भोगणारे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आमदार संजय देवतळे यांनी तिकीट कटताच अवघ्या काही तासांत नुसता भाजपात प्रवेशच घेतला नाही तर वरोरा मतदारसंघातून भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर केला. अशी अनेक उदाहरणे गेल्या दोन दिवसांत राजकीय वर्तुळात खमंग चर्चेचा विषय आहे.नागपूरनागपूर ग्रामीणमधील रामटेक विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमदेवारांची पळवापळवी प्रमुख पक्षांनी केली. त्यात काँग्रेसचे डॉ. अमोल देशमुख हे राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीचे तथा २००९ ची निवडणूक गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून निवडणूक लढविणारे डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे भाजपच्या गळाला लागले. इतर विधानसभा मतदारसंघात मात्र पक्ष बदलविणारे उमेदवार नसले तरी त्यांनी बंडखोरी पुकारली. कामठीतून काँग्रेसचे सुरेश भोयर, उमरेडमधून राजू पारवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बऱ्याचशा मतदारसंघात प्रमुख पक्षाकडून उमेदवार हा बाहेरचा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात हिंगण्यातून शिवसेनेच्या तिकिटवर लढणारे माजी खा. प्रकाश जाधव, भाजपचे समीर मेघे, काटोलमध्ये भाजपचे डॉ. आशिष देशमुख, रामटेकमध्ये काँग्रेसचे सुबोध मोहिते यांचा समावेश आहे. नागपूर शहराचा विचार करता दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला. याच मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. अमरावतीमाजीमंत्री, काँग्रेसचे सुनील देशमुख यांनी शुक्रवारी भाजपत प्रवेश घेतला. अमरावती मतदारसंघातून देशमुख यांना भाजपने उमेदवारी दिली. माजीमंत्री काँग्रेसच्या वसुधा देशमुख यांनीसुद्धा काँग्रेसचा ‘हात’ सोडून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाताला बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अचलपुरातून वसुधातार्इंना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी अचानक राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्या अचलपुरातून शिवसेनेच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या महिला नेत्या सुलभा खोडके यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, खोडके आता बडनेरा मतदारसंंघातून काँग्रेसच्या ‘पंजा’वर निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारी मिळण्यासाठीचा हा पक्ष बदल असल्याचे मानले जात आहे. यवतमाळयवतमाळ विधानसभा मतदारसंघातून माणिकरावांनी चिरंजीव राहुलसाठी काँग्रेसची उमेदवारी मागितली. वडील प्रदेशाध्यक्ष असल्याने उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे गृहित धरून राहुलने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी चालविली होती. मात्र अचानक शनिवारी सकाळी १० वाजता माणिकरावांनीच ‘तूर्त थांबा’ असा संदेश पाठविला. या संदेशामुळे राहुल ठाकरेंचे तिकीट कापल्याची चर्चा गावभर पसरली. तिकडे नंदिनी पारवेकरांकडे नामांकनाची तयारी सुरू करण्यात आली होती. दुसरीकडे यवतमाळच्या विद्यमान आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांनीही आपले तिकीट कापले जावू नये म्हणून अखेरपर्यंत प्रयत्न चालविले. त्यांनी शुक्रवारी दिल्लीत सोनिया गांधींचीही भेट घेतली. त्यांच्यासाठी काँग्रेसच्या महिला आघाडीने लॉबिंग केले. त्यामुळे नंदिनी पारवेकरांना पुन्हा यवतमाळची उमेदवारी दिली जावू शकते, याची चिन्हे दिसताच माणिकराव आक्रमक झाले. त्यांनी दिल्लीतील नेत्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिल्याचे काँग्रेसच्या गोटात चर्चिले जात आहे. अखेर या धमकीपुढे नमते घेत राहुल ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आले.चंद्रपूरसंजय देतवळे यांंनी वरोरा विधानसभेच्या माध्यमातून वारंवार सत्ता उपभोगली. विरोधक त्यांच्यावर आगपाखड करीत असताना पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत पर्यावरण व सांस्कृतिक खात्याचे मंत्रीपद बहाल केले. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांची तिकीट कापून अलिकडेच पार पडलेल्या लोकसभेची उमेदवारीही दिली. इथपर्यंत देवतळेंची पक्षनिष्ठा कायम होती. आता पक्षाने त्यांची विधानसभेची तिकीट नाकारल्याने काही तासातच त्यांना पक्षाचे तत्वं पटणासे वाटू लागले.शनिवारी त्यांनी भाजपात प्रवेश करीत वरोरा विधानसभेत उमेदवारी दाखल करून पक्षासोबत आपल्या मतदारांनाही जबर धक्का दिला आहे. इकडे चंद्रपुरात भाजपात एकनिष्ठ राहून प्रामाणिक कार्य करणारे किशोर जोरगेवार यांनीही ऐनवेळी भाजपाला रामराम ठोकला. माजी आमदार सुदर्शन निमकरांनी तर कहरच केला. आघाडी असल्याने राष्ट्रवादीत उमेदवाराची डाळ शिजणार नाही म्हणून त्यांनी मुंबईतील मातोश्रीत जाऊन शिवबंधन बांधले व पक्ष बदलला. शिवसेनेही त्यांना तिकीट दिली. मात्र आघाडी फुटताच त्यांना पुन्हा राष्ट्रवादी आवडू लागली. १६ तासातच आणखी पक्ष बदलला. पावलोपावली दल बदलणारा नेता यानिमित्ताने मतदारांनाही बघता आला. गोंदियातिरोडा मतदार संघात भाजपचे अनेक वर्षांपासून निष्ठावान राहिलेले पदाधिकारी, माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी शनिवारी शिवसेनेच्या तिकीटवर नामांकन दाखल केले.आमगाव विधानसभा मतदार संघातून गेल्यावेळी भाजपचे उमेदवार असलेले आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे रमेश ताराम यांना यावेळी भाजपने डावलताच ते राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले आणि शेवटच्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटवर नामांकन भरले. अर्जुनी मोरगाव मतदार संघातही भाजपच्या जि.प.सदस्य किरण कांबळे यांनी तिकीट न मिळाल्याने शनिवारी शिवसेनेच्या तिकीटवर नामांकन दाखल केले. या तीनही उमेदवारांच्या अनपेक्षित पक्षप्रवेशाने आणि उमेदवारीमुळे चर्चाना मात्र ऊत आला आहे. भंडारातुमसर विधानसभा मतदारसंघाचे तीनदा नेतृत्व केलेले भाजपचे माजी आमदार मधुकर कुकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आज शनिवारला नामांकन दाखल केले. सन १९९५, १९९९ आणि २००४ असे तीनदा ते आमदार राहिले. सन २००४ मध्ये पराभव झाल्यानंतर यावेळी भाजपकडे उमेदवारी मागितली. भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे कुकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पक्षांतर, रुसवे-फुगवे अन् बंडखोरीही
By admin | Published: September 28, 2014 1:00 AM