एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असणारी जिल्ह्यातील सुमारे १३५५ पैकी १०२६ मद्यालये सीलबंद झाली होती. त्यापैकी आठ मद्यालये स्थलांतर झाली असून, १८५ प्रस्ताव कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित आहेत. मद्यालय बंदीमुळे एप्रिल २०१७ या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सुमारे १४ कोटींचा महसूल बुडाला आहे.कारवाई झालेल्या वाईन शॉप, परमिट रूम, बीअर शॉपी, तसेच देशी दारू दुकानात पाठीमागील दरवाजातून चोरटी मद्य विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात ‘वॉच’ ठेवून १४१ गुन्हे दाखल करून ७७ व्यक्तींना अटक केली. त्यांच्याकडून सहा वाहनांसह सोळा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. जिल्ह्यात १३५५ मद्यालये होती. नूतनीकरण व अबकारी कर यामध्ये वर्षाला २२० कोटींचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळत होता. त्यासाठी या विभागाकडे १८५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र ५०० मीटर अंतरापर्यंतची असणारी सर्व मद्यालये बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्याचा फटका तारांकित हॉटेलसह नामवंत हॉटेलच्या १०२६ मद्यालयांना बसला. १ एप्रिल २०१७ पासून ही मद्यालये बंद आहेत. सध्या जिल्ह्यात ४०४ मद्यालये सुरू आहेत. मद्यविक्री परवाना असणाऱ्या हॉटेलमध्ये लोकांची गर्दी असायची. ही हॉटेल आता ओस पडल्याने हॉटेल व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर अनेक कामगारांना नोकरी नसल्याने त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीलबंद झालेल्या दुकानदारांनी मद्यालये स्थलांतरित करून १९३ प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाला सादर केले आहेत. त्यापैकी आठ मद्यालयांना परवानगी दिली आहे. स्थलांतर दुकाने अशीकोल्हापूर शहर - तीन वॉईन शॉप (धैर्यप्रसाद चौक, हॉकी स्टेडियम, खानविलकर पेट्रोल पंप) इचलकरंजी - १ (वॉईन शॉप) गोकुळ शिरगाव - देशी दारूसरवडे (ता. कागल) - देशी दारू आजरा - परमिट रुम ५०० मीटर अंतराच्या बाहेर जिल्ह्यात आठ मद्यालयांना स्थलांतरास परवानगी दिली असून, १८५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. बंदीमुळे एप्रिल महिन्यात १४ कोटींचा महसूल बुडाला. - संजय पाटील, प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
आठ मद्यालयांचे स्थलांतर
By admin | Published: May 20, 2017 1:08 AM